चंद्रपूर: खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाला दहा दिवसाचा कालावधी लोटला नसतानासुध्दा काहींनी रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवार कोण असे सर्वेक्षण समाज माध्यमावर सुरू आहे. तेरवी चा कार्यक्रम होण्यापूर्वी कोणत्या ‘महाभागाने’ हे सर्वेक्षण केले असा प्रश्न यानिमत्ताने उभा ठाकला आहे. हे पक्षाचे सर्वेक्षण नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. त्यामुळे तो ‘सर्वेक्षण’ पोल घेणारे ‘महाभाग’ कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

कॉग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे. मात्र अशातच कॉग्रेसच्या वतीने चंद्रपूर लोकसभेसाठी योग्य उमेदवार कोण असे सर्वेक्षण समाज माध्यमावर सुरू आहे. या सर्वेक्षणात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष तथा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे ज्येष्ठ बंधू अनिल धानोरकर या सात नावांचा समावेश आहे. धानोरकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तेरवीचा कार्यक्रमही अजून आटोपलेला नाही, अशातच कॉग्रेसच्या वतीने अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कॉग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कुणाचातरी खोडसाळपणा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही गोंदिया येथे माध्यमांशी बोलतांना कॉग्रेस पक्षात अशा प्रकारचा सर्वे झालेला नाही असे सांगितले. यामागे कॉग्रेसमधील काही उपद्रवीमुल्य असलेले नेते असल्याचे बोलले जात आहे.

‘त्या’ सर्वेक्षणाची पोस्ट डिलीट
कॉग्रेसच्या ऑनलाईन सर्वेक्षणाचे वृत्त प्रकाशित होताच समाज माध्यमावरील कॉग्रेसच्या ऑनलाईन सर्वेक्षणाची पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. सर्वक्षणाचे वृत्त सार्वत्रिक होताच अवघ्या २४ तासात ही पोस्ट डिलीत करण्यात आली आहे. त्यामुळे या मागे कुणीतरी सूत्रधार आहे अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!