क्रिकेट बुकीचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक

तिघांना अटक : तीन कोटींची मागितली होती खंडणी

चंद्रपूर : शस्त्राचा धाक दाखवून तीन कोटींच्या खंडणीकरिता येथील क्रिकेट बुकी प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज (३६, रा. बिनबा गेट, चंद्रपूर) शेख नूर शेख इस्माईल ऊर्फ रशीद (३८, रा. नागपूर) व अजय पुनमलाल गौर (३५, रा. नागपूर) या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Recommended read: हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी संशयास्पद बोटीत तीन एके-47 आढळल्याने खळबळ

महाकाली परिसरातील प्रदीप गंगमवार हा मोठा क्रिकेट बुकी आहे. १५ ऑगस्ट रोजी गंगमवार व त्याचा मित्र झाडे जुगार खेळण्यासाठी जात असताना मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज या त्यांच्याच एका मित्राने आपल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने शस्त्राचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले. दोघांनाही नागपुरात नेण्यात आले. तेथून दोघांनीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.

चंद्रपूर येथे येताच दोघांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तीन पथके गठित करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. तिन्ही आरोपी घुग्घुस येथील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, आरोपी रात्रीच तिथून पांढऱ्या रंगाच्या कारने गडचांदूर येथे निघून गेल्याची माहिती मिळाली.

गडचांदूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. कोरपना पाेलिसांनी कार अडवून तिघांनाही ताब्यात घेतले. यानंतर आरोपींना दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Recommended read: राजुराच्या वाहतूक नियंत्रकाची बल्लारपुरात आत्महत्या

पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व सहकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!