विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
चंद्रपूर: बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करण्यात यावी, परिक्षा शुल्क कमी करण्यात यावे यासह राज्य सरकारच्या खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. आक्रोश मोर्चा दिक्षाभूमी मार्गे जटपुरा गेट, गांधी चौक ते जटपुरा गेट, पाणी टाकी चौक मार्गक्रमण करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी केला. शासकीय नोकरी मिळावी यासाठी गरीब घरचे विद्यार्थी शहरात येवून अभ्यासिकेत अभ्यास करतात. आणि त्यांचा तोंडाचा घास पळविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. शासकीय नोकरी मिळविणे हा राज्यातील सुशिक्षित तरुणाचा हक्क आहे. बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे परवाने वाटप केल्या जात आहे. राज्य सरकार नवी वेठबिगारी निर्माण करू पाहत असल्याचा आरोप जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केला आहे.
कंत्राटीकरणचा हा शासन आदेश तात्काळ रद्द करावा, सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, एनपीएस रद्द करून शिक्षक-राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एमपीएससी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून १०० रुपये ठेवावे, खासगी संस्थामार्फत विविध पदाच्या स्पर्धा परिक्षा न घेता सर्व परिक्षा लोकसेवा आयाेगाद्वारे घेण्यात याव्या, स्पर्धा परिक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कडक कायदा करा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करण्याचा मागणीला घेवून शिक्षण – नोकरी बचाव समितीच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जनआक्रोश मोर्चाला हा दिक्षाभूमी येथून प्रारंभ झाला. रस्त्यामध्ये मार्गावर असलेल्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोर्चात सहभाग घेतला. मोर्चा जटपुरा गेट मार्गे गिरणार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, पाणी टाकी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
चौकट
मोर्चात पहिल्यांच हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात पहिल्यांदाच हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आक्रोश मोर्चात सहभाग घेतला आहे. मोठ्या उत्स्फूर्तपणे मोर्चा सहभागी होत मनोगतामध्ये राज्य सरकारच्या धोरणावर टिका करीत निषेध नोंदविला.