बोर्डा गावातील घटनेने खळबळ

विष पाजून वडील फरार

चंद्रपूर: जन्मदात्या वडिलाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर सुमित (वय ७), मिस्टी (वय ३) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. वरोरा तालुक्यातील बोर्ड येथे संजय कांबळे हे कुटुंबीयांसह राहतात. खासगी शिकवणी हा त्यांचा व्यवसाय होता. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

Recommended read: विविध प्राधिकरणाच्या निवडणुका महाराष्ट्रात सर्वात प्रथम घेणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातले पहिले विद्यापीठ

काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पनिता (वय ३५) ही एका महाविद्यालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीवर जात होती. त्यांच्या संसारवेलीवर सुमित (वय ७), मिस्टी (वय ३) अशी दोन फुले उमलली होती. सुखात संसार सुरू होता. परंतु, मागील काही दिवसांपासून संजय कांबळे यांची मानसिकस्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते.

शुक्रवारी सकाळी पत्नी पनिता ही कॉलेजमध्ये कामानिमित्त गेली होती. सुमित आणि मिस्टी ही दोन मुले वडिल संजय कांबळे यांच्यासोबत घरी होती. सायंकाळी पनिता कांबळे या घरी आल्या. घराचा मुख्य दरवाजा लावलेल्यास्थितीत होता. परंतु, पतीची चपल तिथे नव्हती. त्यामुळे ते बाहेर गेले असावे, असे तिला वाटले. त्यानंतर घराचा दरवाजा उघडून बघितले असता तिला मोठा धक्का बसला. दोन्ही मुले बेडवर पडलेली होती. तोंडातून फेस बाहेर आलेला होता.

Recommended read: हॅलो, मी तुमच्या घरी चोरी केली! अजब चोरटयाचा गजब पराक्रम

तिच्या ओरडण्याने शेजारच्या नागरिकांनी धाव घेतली. तातडीने दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.

या दोन्ही मुलांना आधी विष दिले. त्यानंतर गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

या घटनेची तक्रार वरोरा पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी वडिल संजय कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!