शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिलासा.

चंद्रपूर : राज्यातील जवळपास २८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये तफावती असल्याने अवैध ठरले. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका बळावला होता. शिक्षक अतिरिक्त ठरू नये म्हणून विद्यार्थी पटसंख्येनुसार शैक्षणिक सत्र २०२२-२३ ची संच मान्यता निश्चित करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आल्याने शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे.

Recommended read: प्रोटोकॉल न पाडल्याने सहा संचालकाचा कार्यक्रमावर बहिष्कार

विद्यार्थी संख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना संच मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाईन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली होती. त्याअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवायची आहे. परंतु या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व तांत्रिक बाबींमुळे इनव्हॅलीड झाले. प्रत्यक्षात पटसंख्या असताना सुद्धा शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढवली होती.

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा त्या निवेदनाची दखल

शाळांतील हजेरी पटावर असलेली विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून शैक्षणिक सत्र २०२२ – २३ ची संच मान्यता देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिनांक २५ मे २०२३ रोजी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी मा. सचिव, मा. शिक्षण आयुक्त व मा. शिक्षण संचालक यांना दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन ७ जून २०२३ रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) व मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थी पोर्टलवरील इनव्हॅलीड असलेले विद्यार्थी, हजेरी पटावर असल्यास त्यांना संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे व त्यासाठी परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे.

शाळेतील जे विद्यार्थी नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे कडून पडताळणी करून संच मान्यता ग्राह्य धरण्यात येईल. नाव, लिंग, जन्मतारीख जुळत नसलेले, आधार क्रमांकासाठी नोंद केलेले तसेच आधार उपलब्ध नाही असे विद्यार्थी तसेच आधार इनव्हॅलीड/ अनप्रोसेस / आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी नियमित शाळेत येत असल्यास असे विद्यार्थी सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल.

शिक्षक वृंदांकडून आमदार सुधाकर अडबाले व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मानले आभार

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधार वैध / अवैध व संच मान्यताबाबत आमदार अडबाले यांनी शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी लावून धरली होती. सोबतच पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. शिक्षक हितासाठी नेहमी आग्रही भूमिका घेऊन लढणारे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक वृंदांकडून आमदार सुधाकर अडबाले व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आभार मानण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!