रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघीण ठार

मध्य रेल्वे मार्गावरील चनाखा गावाजवळील घटना

चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील चनाखा या गावाजवळ रेल्वे रुळावर एका पूर्ण वाढ झालेल्या वाघिणी चा मृतदेह बुधवारी १० ऑगस्टला सकाळी आढळून आला. दिल्ली ते चेन्नई रेल्वे मार्गावर चनाखा या गावाजवळ रेल्वेने या वाघाला धडक दिली असावी, असा अंदाज रेल्वे व वनविभागाने व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेच्या या मार्गावर रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता रेल्वे ट्रक तपासणी करीत असताना चनाखा ते विहिरगाव दरम्यान कक्ष क्रमांक १६० मध्ये रेल्वे रुळालगत वाघ मृतावस्थेत पडून असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

Recommended read: चंद्रपूरातील प्रसिद्ध चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयावर छापा

या कर्मचाऱ्याने तातडीने चुनाळा (माणिकगड) रेल्वेस्टेशन प्रमुखाला याची माहिती दिली. त्यांनी राजुरा वनविभागाला कळविताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद जल्लेवार आणि डॉ. कुंदन गोडशेलवार, डॉ.राठोड यांनी वाघाचे शव विच्छेदन केले.

माहिती मिळताच मध्य चांदा वन विभागाच्या उप वनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी घटनास्थळी भेट दिली. चंद्रपूर येथील मानद वन्यजीवरक्षक बंडू धोत्रे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. प्राप्त माहितीनुसार रेल्वेच्या धडकेत ठार झालेली ही पूर्ण वाढ झालेली साधारणता चार वर्षाची वाघीण होती.

कोठारी परिसरात या वाघिणीचे लोकेशन होते, मात्र कधीकधी ती या भागात यायची. डुकराची शिकार करतांना ती रेल्वे रुळावर आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेच्या प्रकाशात तिचे डोळे दिपून गेल्याने ती हालचाल करू शकली नाही आणि जागेवरच तिला धडक बसली. तीच्या मृतदेहाचे तुकडे रेल्वे मार्गावर ७०० मीटर पर्यंत आढळून आले.

Recommended read: आई ला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने केला खून

मध्यरेल्वे मार्गात आतापर्यंत वाघ, अस्वल, चितळ असे अनेक वन्यप्राणी रेल्वेच्या धडकेत ठार झाले आहेत. आता या वन क्षेत्रात मानवाचा वावर वाढल्याने वन्य प्राणी आपले क्षेत्र सोडून बाहेर येत आहेत. त्यामुळे ते अशा अपघातांना बळी पडत आहेत. रेल्वे मार्गा पासून सुरक्षा व्हावी, म्हणुन किमान पंधरा ते वीस किलोमीटर क्षेत्राला दोन्ही बाजूने संरक्षक जाळी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

बल्लारपूर गोंदिया रेल्वेमार्गावरही झाला होता वाघिणी चा मृत्यू

यापूर्वी बल्लारपूर ते गोंदिया या रेल्वेमार्गावरसुध्दा रेल्वेने धडक दिल्याने एका वाघिणीचाी मृत्यू झाला होता. दिवसागणिक चंद्रपूरातील रेल्वे मार्ग वाघ व इतर वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!