पर्यटकांना विरा वाघिणीसह बछड्यांचे दर्शन

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बाब असून चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या विरा नामक वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ताडोबात आता वाघांचे कुटुंब चांगलेच फुलू लागल्याची चर्चा परिसरातील नागरिक व पर्यटकांमध्ये सुरू झाली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या १८० असल्याची माहिती येथील गाईड देतात. बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात वाघांचा सतत संचार असतो. याच जंगलात विरा नावाची वाघीण संचार करत असल्याचे अनेक पर्यटकांनी पाहिले. पर्यटकांना नेहमी दर्शन देणारी ही विरा वाघीण झुनाबाई आणि कंमकाझरी यांची कन्या असल्याचे सांगितले जाते. विराने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला. झायलो नामक रूबाबदार वाघ त्या बछड्यांचा पिता असल्याची माहिती सूत्राने दिली. दोन बछड्यांचा जन्म झाला असल्याचे शुभसंकेत आहेत.

विरा वाघीण नेहमी गोंडमोहाळी-पळसगाव परिसरात वावरायची. पळसगाव पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना ही वाघीण आपल्या दीड ते दोन महिन्यांच्या दोन बछड्यांसह दर्शन देत आहे. विरा वाघिणीचा एक बछडा तिच्या पाठीवर बसून मस्त खेळत आहे. तर एक दिमाखात समोर बघत आहे. आनंदाची बाब म्हणजे तिचा बछडा एक मादी आणि एक नर असल्याचे माहिती आहे. ही वंशवेल मागील सहा वर्षांतील असल्याचे समजते. व्याघ्र संवर्धनाच्या अनुषंगाने ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे. चंद्रपूर जिल्हा आता खऱ्या अर्थाने वाघांचे माहेरघर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!