राजुरा – सास्ती : ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणी ठार – दुसरी जखमी

निगरगट्ट प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडेल काय ?


राजुरा: राजुरा – सास्ती या वेकोलिची कोळसा खाण आणि सास्ती, बल्लारपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे चुकविताना दुचाकीने जाणाऱ्या तरुणींच्या गाडीला एका ओव्हरलोड कोळशाची वाहतूक ट्रक ने धडक दिली. या दुर्घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी आहे. दिनांक 28 सप्टेंबर ला रात्री ही घटना घडली.

Recommended read: शाळेत जाणे टाळण्यासाठी त्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

दिनांक 28 सप्टेंबर ला सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान राजुरा येथील विद्यार्थिनी कु. प्रियंका विठ्ठल बोबडे, वय 20 आणि तिची मैत्रीण रामपुर येथील कु. प्रणीता बंडु सोनेकर या दोघी स्कूटी गाडी क्रमांक एमएच 34/ एजी 0050 या दुचाकीने बल्लारपूर येथून सास्ती मार्गे राजुरा कडे येत होत्या.

प्रियंका ही गाडी चालवत होती व प्रणीता सोनेकर दुचाकी मागे बसून होती. येतांना सास्तीच्या पुढे धोपटाळा गावाजवळ असलेल्या वेकोलिच्या इनटेक वेल व हनुमान मंदिराजवळ राजुराकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएलएच 40/ एके 3125 च्या चालकाने बेजवाबदारपणे ट्रक चालवीत खड्डे असतानाही वेगाने ट्रक पुढे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकचा समोरील टायर दुचाकीला लागल्याने दोन्ही तरुणी दुचाकीवरून जोरदारपणे खाली पडल्या.

त्यात मागे बसलेली कु. प्रणीता सोनेकर हिच्या पोटाला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरी तरुणी कु.प्रियंका बोबडे हिच्या पायाला दुखापत झाली. घटना घडताच नागरिकांनी या तरुणींना त्वरित रुग्णालयात पाठविले.

Recommended read: सातबारावर नाव नोंदणीसाठी लाच घेताना तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

या घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसानी घटनास्थळी येऊन ट्रक चालक मनोज रामचंद्र खैरे, राहणार रमाबाई वॉर्ड राजुरा याला ताब्यात घेतले. या ट्रक चालकावर भादंवि कलम 279, 304 अ, 337, 284 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलीस करीत आहेत.


निगरगट्ट प्रशासनाचा बळी ?

राजुरा – सास्ती, राजुरा – गोवरी – कवठाला या दोन्ही मार्गावर पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर कोळसा, सुरजागड येथून कच्चे खनिज घेऊन येणारे चौदा, अठरा चाकी ट्रकची वेगाने होणारी वाहतूक आणि हाच रस्ता वेकोलि कामगार यांच्यासाठी कोळसा खाणीत जाणारा मार्ग आहे.

सास्ती आणि सास्ती मार्गे बल्लारपूर – चंद्रपूर येथे जाणारा हा मार्ग आहे. एवढे मोठे खड्डे पडल्यानंतर यापूर्वी अनेक छोटे-मोठे अपघात झाले. मात्र त्यात कुणाचा मृत्यू झाला नव्हता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेकदा रास्ता रोको, धरणे आंदोलने केली. दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर टायर पेटवून निषेध नोंदविला.

Recommended read: रोटरी क्लब नृत्य स्पर्धा : नागपुरचा कुणाल मोहोड पहिला

यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाची दखल घेत रस्त्यातील खड्डे गिट्टी, माती टाकून दुरुस्ती केली. मात्र पाऊस आल्यावर वजनदार ट्रकच्या वाहतुकीने पुन्हा तीच स्थिती व्हायची. सुरजागडची येथून वाहतूक व्हायचे तसे काही कारण नाही. यासाठी वेगळा सरळ मार्ग उपलब्ध आहे. परंतु याच मार्गाने ही ओव्हरलोड सुरू आहे.

रेल्वे लाईन बंद झाल्याने कोळशाची वाहतूक वाढली आहे. कोळशाचेही ओव्हरलोड ट्रक वाहतूक करीत असतात. प्रादेशिक परिवहन विभागाला तर याचे काही सोयरेसुतुक नाही. अखेर या रस्त्यावरील खड्डे आणि ट्रकच्या बेधुंद वाहतुकीने एका निरपराध तरुणीला आपला जीव गमावावा लागला. येथील नागरिक मात्र हा अपघात नसून प्रशासनाच्या दुरवस्थेचा बळी समजत आहेत.

एका तरुणीच्या दुखःद अपघाती मृत्यू नंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल का, हा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!