चंद्रपूर : मी माझ्या आयुष्याच्या कारकीर्दीत सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ व शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करीत आलेलो आहों, हाच बाणा कायम ठेवत ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून अनौपचारिक बैठकी दरम्यान संवाद साधतांना विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे बोलत होते.पुढे बोलताना डॉ. जीवतोडे म्हणाले की, माझे वडील शिक्षण महर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी पूर्व विदर्भात शिक्षणाची दारे बहुजन समाजाकरीता उघडी करून दिली. त्यामुळे गेल्या सहा दशकांत आमच्या परिवाराला पूर्व विदर्भात शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून काम करता आले. यापुढे जावून सामाजिक चळवळीत काम करून आम्ही समाजाचे देणं लागण्याचे काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात ओबीसी, विदर्भ विकास चळवळ राबवितांना येथील बहुजन समाजाच्या मुळ प्रश्नांना हात घालण्याचे काम करता आले. शासन दरबारी रेटा लावून अनेक प्रश्न मार्गी लावले. ओबीसी हितासाठी अनेक शासन निर्णय निघाले. ओबीसी समाजात जाणीव जागृती झाली. याचे फलित आम्ही राबविलेल्या चळवळीला जाते. तसेच स्वतंत्र विदर्भ विकास चळवळीत शिक्षण महर्षी स्व. जीवतोडे गुरुजी यांच्या पासून आम्ही सक्रिय आहोत. विदर्भ राज्य व्हावे, ही आमची मागणी आहे मात्र तोपर्यंत विदर्भीय जनतेचा विकास होत रहावा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. पत्र-व्यवहार, निवेदने, आंदोलने, धरणे, रास्ता रोको, मोर्चा, बैठका, अधिवेशने ही आमच्या चळवळीची शस्त्रे राहिली आहेत.

८ डिसेंबर २०१६ ला नागपूर येथील अधिवेशनावर काढलेला ओबीसी समाजाचा भव्य न भूतो… मोर्चा काढला होता, तो ओबीसी आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा होता. या मोर्चाची दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणविस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली, हे या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल. देशभरात विविध राज्यात देशव्यापी अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी चळवळीला बुलंद करण्याचे काम सुरू आहे. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे याकरिता विदर्भातील विविध जिल्ह्यात विदर्भवादी नेते मान. ऍड. श्रीहरीजी अणे यांचे नेतृत्वात यशस्वी जनमत चाचणी घेतली होती, ती अलिकडल्या काळातील स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे व विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरीता केलेले मोठे आंदोलन म्हणावे लागेल. मंडल आयोगावेळेस तत्कालीन सरकारने ओबीसींना शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीत आरक्षण दिले होते. त्यामुळे ओबीसी चळवळ राबविताना ओबीसींचे हक्क अबाधित राहावे, हीच आमची अपेक्षा आहे.भारतीय जनता पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो सर्व पक्षांसोबत आमचे संबंध सलोख्याचे राहिले आहेत. आमचा उद्देश हा केवळ विदर्भ प्रदेशाचा व येथील ओबीसी व बहुजन जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष हे आम्हाला समाजहित जपण्याचे साधन राहिले आहे.ओबीसी व बहुजन समाज हा विदर्भातील जळणघडणीचा कणा आहे. या समाजाचे उत्थान झाले पाहिजे, या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे. येथील जल, जंगल, जमीन, कोळसा, विज याचा लाभ येथील स्थानिक जनतेला व्हायला पाहिजे. येथे पर्यावरण पूरक उद्योग व्यवसाय वाढावे, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, राहणीमान उंचावे, ही आमची आग्रही भूमिका आहे. शैक्षणिक संस्थेत आत्महत्या ग्रस्त, पूरग्रस्त, कोरोनाने मृत, आदी पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची दारे उघडी आहेत. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या दत्तक घेतल्या गेले आहेत. सोबतच सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती कार्यक्रम, वृध्दाश्रमांना मदत, रुग्णांना मदत असे समाजपुरक अभियान सुरू असतात, ते अविरत सुरू राहतील.म्हणून आता उर्वरीत आयुष्य हे ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी कार्य करीत राहू, हा प्रण असल्याचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!