शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून खा. बाळू धानोरकर यांना साश्रूनयनांनी श्रद्धांजली
चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते, हितचिंतक, चाहत्यांनी साश्रूनयनांनी खा. धानोरकर यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी अख्खे वरोरा शहर शोकसागरात बुडाले होते. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून खा. धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वरोरा येथील स्नेहनगरातील निवासस्थानातून सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. पार्थिवाशेजारी खा. धानोरकर यांचे बंधू भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, दोन्ही मुले व कुटुंबीय होते, तर वाहनामध्ये पत्नी आ. प्रतिभा धानोरकर, आई, बहीण व नातेवाईक होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी रखरखत्या उन्हातही लोकांनी गर्दी केली होती. संपूर्ण वरोरा शहर कडकडीत बंद होते.

दुपारी एक वाजताच्या सुमारास बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. यानंतर दोन्ही मुलांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार नरेश पुगलिया, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार आशीष देशमुख, काँग्रेसचे प्रदेश महामंत्री अतुल कोटेचा, रवींद्र दरेकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना नेते खा. विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, माजी खासदार प्रकाश जाधव, माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजेंद्र वैद्य, नंदू नागरकर, जिल्हा बँक संचालक संजय देरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.