साहित्य संमेलन आयोजनासाठी संस्थांना सात लाखाचा निधी उपलब्ध करून देणार- आ. जोरगेवार

तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आ. जोरगेवार यांची घोषणा

चंद्रपूर : आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजोपयोगी आचार-विचारांची देवाण-घेवाण होताना दिसत नाही. ज्या सहित्यांनी समाजाचे प्रबोधन केले, असे साहित्य समाजापुढे सातत्याने आले पाहिजे. साहित्य आचार विचारांच्या देवाणघेवाणीचे उत्तम माध्यम असून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. साहित्य संस्थांच्या आपण पाठिशी असून कोणतीही संस्था साहित्य संमेलन घेत असेल तर त्या संस्थेला सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

Recommended read: रोहित्रातील वीजप्रवाहाच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहयोगाने सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून आ. किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, कीर्तीवर्धन दीक्षित, इरफान शेख, संजय वैद्य, स्वागताध्यक्ष श्याम माहेरकर, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर यांची उपस्थिती होती.

आ. जोरगेवार पुढे म्हणाले, कोणत्याही शहराची ओळख ही तेथील साहित्य व संस्कृतीने होत असते. यादृष्टिकोनातून चंद्रपूर हे समृद्ध असे शहर असून या शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांनी चंद्रपूरची गौरवशाली ओळख निर्माण केली आहे. साहित्यामधून आचार-विचारांची देवाणघेवाण होत असते. ही देवाणघेवाण महत्त्वाची आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ही साहित्यिक चळवळ नेहमी अशीच कायम रहावी, यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.

Recommended read: नऊ बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर पकडला.

रविवारी सकाळच्या सत्रात आठ वाजता रेवानंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बाबुराव होगे स्मृती कवी संमेलन पार पडले. यात राज्यातील कवींनी सहभाग नोंदवला. त्यानंतर नागपुरातील विदर्भ साहित्य संघाच्या प्रथालयाची निर्मिती असलेल्या मराठी भाषेचा प्रवास सांगणारा ‘मी मराठी बोलतेय’ हा सांगितिक कार्यक्रम वृषाली देशपांडे व विवेक अलोणी व चमूने सादर केला. त्यानंतर दुपारी अडीच वाजता समाज माध्यमे आणि वर्तमान साहित्य एक आकलन या विषयावर तिसरे चर्चासत्र झाले.

बालाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ.अविनाश कोल्हे, राजेश मडावी, राजेंद्र वैद्य व बालाजी सुतार यांनी मत व्यक्त केले. यानंतर डॉ. केशव सखाराम देशमुखांची मुलाखत पार पडली. संचालन व आभार वैशाली धनविजय यांनी केले. श्रोत्यांमध्ये संमेलनाध्य जनकवी इंद्रजित भालेराव, स्वागताध्यक्ष डॉ. श्याम मोहरकर, डॉ. रवींद्र शोभणे, कवी अशोक कोतवाल, आयोजक इरफान शेख, ना. गो. थुटेसह, राजेंद्र वैद्य, संजय वैद्य असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!