जीएसटी विभागाकडून चढ्ढा ट्रान्सपोर्ट चे महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त

चंद्रपूर: येथील कोळसा व वाहतुक व्यवसायिक चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या घुग्घुस-पडोली मार्गावरील कार्यालयावर वस्तू व सेवा कर विभागाच्या नागपूर आयुक्त कार्यालयाने छापा मारल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मागील काही वर्षापासून चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनी ही कोळसा व्यवसायात सक्रीय आहे. त्यामुळे वस्तू व सेवा कर विभागाने या कंपनीकडे विशेष लक्ष ठेवले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास वस्तू व सेवा कर विभागाच्या नागपूर कार्यालयातील अधिकारी तथा चंद्रपूर कार्यालयातील अधिकारी यांनी संयुक्तपणे चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पडोली-घुग्घुस मार्गावरील कार्यालयावर छापा मारला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे गोळा करण्यात आल्याची माहिती आहे.

सोमवारी हा छापा पडला असला तरी मंगळवारी सायंकाळ पर्यंत ही कारवाई सुरूच होती. यावेळी ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत कर्मचारी यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. या छाप्यात नेमके काय मिळाले यासाठी चंद्रपूर व नागपूर येथील वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता छापा टाकण्यात आला आहे. आमच्या खात्याचे जनसंपर्क अधिकारी अधिकृत माहिती देतील असे सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच असल्याने मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे उपायुक्त जीएसटी नागपूर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!