आधार लिंक नसल्यास ५० हजार प्रोत्साहन अनुदान पासून शेतकऱ्यांना मुकावे लागणार

चंद्रपूर: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी पीक कर्जांचे खाते आधार कार्डशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्यास त्या शेतकऱ्यांला योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरीत खाते आधार लिंक करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

Recommended read: मनपा आयुक्तांच्या दालनात युवकांचा स्वतःवरच चाकूहल्ला

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यास राज्य शासनाने २९ जुलैला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली असल्यास सदर शेतकरी योजनेस पात्र राहणार आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने व सहकार विभागाने योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे बँकेतील पीक कर्ज खाते आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Recommended read: वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार

शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले खाते आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून पात्र शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकनुसार ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सर्व बँका या योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणार आहे. तसेच सदर याद्या १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत महाआयटीमार्फत विकसित संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत.

प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकीकरणानंतर लाभार्थ्यांच्या बचत खात्यात लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार असल्याने, ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज खाते, बचत खाते आधार लिंक नसतील, अशा शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!