शेतकऱ्यांसमोर संकट : हमीभाव केंद्रांअभावी व्यापाऱ्यांची चांदी
चंद्रपूर : भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्राला वगळले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे जाऊन कापसाची विक्री केल्यास वाहतुकीचा खर्च वाढून शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही शिल्लक राहणार नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात धान उत्पादकांची संख्या मोठी असली, तरी गत काही वर्षांपासून कापूस व सोयाबीन लागवडीचे क्षेत्र कमालीचे वाढले. कपाशीचाच विचार केल्यास यंदाचे पेरणीक्षेत्र १ लाख ६९ हजार ९३६ हेक्टरपर्यंत पोहोचले. यंदा कापसाला चांगला भाव कापसाला मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात कापूस वेचणी सुरू आहे, तर काही ठिकाणी वेचणी झाली. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीच्या तयारीत आहे. दरवर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस खरेदी होते. यासाठी सीसीआय खरेदी केंद्र देते. या केंद्रांवर शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्याची सुविधा प्राप्त होते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज नव्हती. यंदा शासनाकडून कापसाला ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर झाला. मात्र, खुल्या बाजारात ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे.


फक्त तीन केंद्रांनाच मान्यता
सीसीआयकडून दरवर्षी चंद्रपूर, वरोरा, राजुरा आणि कोरपना चेइपब तीन खरेदी केंद्रांना मान्यता दिली जाते. चंद्रपूर तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठी आहे. मात्र, यंदा चंद्रपूरच्या खरेदी केंद्राला वगळले. सीसीआयने याबाबतचे कारण स्पष्ट केले नाही, त्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस कुठे विकायचा हा प्रश्नच आहे. गतर्षी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रासबिहारी ॲग्रो आणि मारोती कॉटन येथे कापूस विक्री केंद्र दिले होते. त्या ठिकाणी ३ हजार ५०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली. एक लाख ४० हजार क्विंटल कापसाची विक्री झाली होती.

शेतकऱ्यांची कापूसकोंडी

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या केंद्रातून मोठ्या प्रमाणावर कापसाची विक्री झाली. त्यामुळे चंद्रपूरला सीसीआयने केंद्र देणे अत्यावश्यक होते मात्र, यंदा चंद्रपूरला सीसीआयने डावलले. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरोरा, राजुरा, कोरपणा किंवा भद्रावतीत जाऊन कापूस विक्री करावा लागणार आहे. तिथे जाणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांना अल्प दरात कापूस विकण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!