चंद्रपूर शहर महापालिकेचा जाहिरात फलक घोटाळा- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप

भाजप पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या सभेतही लावला मनपाला चुना

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी मागील ५ वर्षांच्या कार्यकाळात अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. केवळ कमिशनखोरी कमाविण्याच्या नादात चंद्रपूर शहर महापालिकेचा आर्थिक नुकसान करीत कंत्राटदाराला फायदा पोहचेल, असे अनेक कंत्राट मंजूर केले आहेत. भ्रष्टाचाराच्या यादीत आता जाहिरात फलक घोटाळा समाविष्ट झाला आहे.

Recommended read: दुर्गापूरात अडीच वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला

दहा वर्षांच्या कंत्राटात ६५ लाख ६४ हजार रुपयांचे मनपाचे आर्थिक नुकसान

स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत राजकारणे मीडिया वेव्हज प्रा. लि. नागपूर या कंपनीला शहरातील ९ जाहिरात फलक भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला आहे. याच कंत्राटाचे आधी महापालिकेला वर्षाकाठी १० लाख ८० हजार रुपये प्राप्त होत होते. मात्र, या कंत्राटातून आता केवळ चार लाख २३ हजार ५७० रुपये प्राप्त होणार आहेत. त्यामुळे मनपाचे वर्षाला ६ लाख ५६ हजार ४३० रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सदर कंत्राट दहा वर्षांकरिता असल्याने चंद्रपूर शहर महापालिकेचा ६५ लाख ६४ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. मनपाला येवढे नुकसान सहन करावे लागणार असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला आहे.

शहरातील भिवापूर वार्ड, बाजार वार्ड, इंडस्ट्रीअल वार्ड, सिव्हील वार्ड, उत्तमनगर वार्ड, भानापेठ वार्ड, सिव्हील वार्ड, हॉस्पिटल वार्ड येथील मनपाच्या जागेवर ९ स्थायी जाहिरात फलक आहेत. मे. कुवर टिकमचंद ज्वेलर्स यांना मनपाचे सार्वजनिक शौचालय देखभाल व दुरुस्ती खर्च करण्याच्या मोबदल्यात काही रक्कम घेऊन जाहिरात करण्यासाठी देण्यात आले. मे. कुवर टिकमचंद ज्वेलर्स हे एका फलकाचे १० हजार रुपये याप्रमाणे वर्षाकाठी महापालिकेकडे १० लाख ८० हजार रुपये जमा करीत होते. परंतु, रकमेचा भरणा करीत नसल्याचा ठपका ठेवून पालिकेने सर्व जाहिरात फलक आपल्या ताब्यात घेतले.त्यानंतर महापालिका लोकोपयोगी जनजागृती करण्यासाठी या फलकांचा वापर करीत होती.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रशांत सोनावणे यांच्या ‘ डिव्हाइस डिझाइनला ‘ भारत सरकारची पेटंट मान्यता प्रदान

उपमहापौर राहुल पावडे यांनी १ मार्च २०२२ रोजी आर्थिक वर्षात दोन महिने वेळोवेळी मनपाची निशुल्क जाहिरात करण्याचे अटीवर जाहिरात शुल्कासह भाडेतत्वावर खासगी एजन्सीला दिल्यास मनपाचे उत्पन्नात वाढ होवू शकते. त्यामुळे रेडिरेक्नरप्रमाणे येणाऱ्या किमान भाडेदराचेवर प्राप्त होणाऱ्या खासगी एजन्सीला हे कंत्राट देण्याची मागणी स्थायी समितीकडे केली. त्यानंतर स्थायी समितीने सत्ताकाळ संपत असल्याने शेवटच्या सभेत वार्षिक भाडेतत्वावर दरवर्षी पाच टक्के दर वाढीने दहा वर्षांकरिती देण्याचा ठराव मंजूर केला. यासोबतच नझूलच्या जागेवरील जाहिरात फलक जप्त करून ते खासगी कंपनीला देण्यात यावे, खासगी जागेवरील जाहिरात फलकाचे स्ट्रक्चलर आॅडिट तपासून घ्यावे, असाही निर्णय घेतला.त्यानंतर मनपाच्या वतीने ई-निविदा मागविण्यात आल्या. त्यात आयटी क्राफ्ट टेक्नॉलाजी प्रा. लि. नागपूर (३ लाख ९६ हजार ४६१.५२ रुपये प्रतिवर्ष), स्पॅन कम्युनिकेशन मुंबई (४ लाख सहा हजार ६२७.२० रुपये प्रतिवर्ष), राजकारणे मीडिया वेव्हज प्रा. लि. नागपूर (४ लाख २३ हजार, ५७० रुपये प्रतिवर्ष) यांनी निविदा सादर केल्या. त्यानंतर राजकारणे मीडिया वेव्हज प्रा. लि. नागपूर या कंपनीची २५ टक्के जास्त दराची निविदा असल्याने त्यांना बँक गॅरंटी घेऊन जाहिरात फलकाचे कंत्राट देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या सभेतही कंत्राट देताना मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप रामू तिवारी यांनी केला आहे.

One thought on “चंद्रपूर शहर महापालिकेचा जाहिरात फलक घोटाळा”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!