डॉ. अशोक जीवतोडे यांचा शक्तीप्रदर्शनात भाजपमध्ये प्रवेश

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेते केवळ चेहरे दाखविण्यासाठी आहेत. मात्र, पदे वाटप करताना ती दुसऱ्यांना देऊन ओबीसींना डावलले जाते. आज देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. भाजपचा डीएनए ओबीसी आहे. तेव्हा ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष आहे. आम्ही डॉ. जीवतोडे यांचे भाजपात स्वागत करतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील जनता महाविद्यालयात आयोजित ओबीसी विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार संदीप धूर्वे, आमदार परीनय फुके, आमदार संजीव बोदगुलवार, माजी आमदार शोभा फडणवीस, संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी आमदार आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस डॉ . जिवतोडे यांना संबोधून म्हणाले, हुजुर आते आते बहोत देर कर दी. तुमच्यासाठी सर्वात चांगला पक्ष भाजप आहे. सामान्य घरचा चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. हाच खरा ओबीसींचा सन्मान आहे. प्रधानमंत्री मोदी यांचे अमेरिकेत ज्या पद्धतीने स्वागत झाले त्यामुळे जगात देशाची मान उंचावली आहे. आज कधी नव्हे ते देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहे. भाजपचा डीएनए ओबीसी आहे. भाजपने ओबीसी विद्यार्थिसाठी परदेशी शिक्षणासाठी शिषयवृत्ती दिली. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या ओबीसी विद्यार्थांसाठी अनेक कार्यक्रम सुरू केले.समृध्दी गडचिरोली व गोंदिया येथे जात आहे. आता चंद्रपूर साठी विचार करू असेही फडणवीस म्हणाले. खाण उद्योजकांनी गडचिरोली वसाहती सारखा उपयोग करू नका, त्यामुळेच आम्ही गडचिरोलीत पोलाद कारखाना आणला आहे. विदर्भात ४० हजार कोटीची विकास कामे आणली आहेत असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ.अशोक जीवतोडे म्हणाले, १९६३ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा रेकॉर्ड तत्कालीन सरकारने सिज केला. त्यामुळे विदर्भात शेक्षणीक जाळे विणनारे श्रीहरी जिवतोडे गुरुजी समाज कारणातून राजकारणात आले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी भाजपतून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भाजप हा विदर्भ विकासासोबत ओबीसींचा विकास बघतो. ओबीसी विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जी.आर. काढले आहे. मागासवर्गीय आयोगाला सवेधनिक दर्जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. विदर्भाचा विकास विदर्भातील ११ जिल्ह्यातून मुंबईपर्यंत गेला पाहिजे असेही जीवतोडे म्हणाले.

यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त परिचारिका पुष्पा पोडे यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी निधी खेचून आणला असेही ते म्हणाले. पाहुण्यांचे स्वागत चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे, श्रीमती प्रतिभा जोवतोडे, अंबर जीवतोडे यांनी केले. संचालन रवींद्र वरारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना मोबाईल नंबर डायल करून भाजपचे सदस्य होण्याचे आवाहन केले. दरम्यान भद्रावती येथील जैन मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनसे नेते रमेश राजूरकर यांनी भाजपात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!