हवालाची ४ कोटी २० लाखाची रोकड जप्त

तिघे ताब्यात, नागपूर पोलिसांची कारवाई

नागपूर: नागपूरातील कोतवाली परिसरातील एका इमारतींत पोलिसांनी धाड टाकून तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी २० लाखांची रोकड जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना मिळाली. त्यावरून इंद्रायणी परिसरातील इमारतीत पोलिसांनी छापा टाकला. तेथे नेहाल सुरेश वडालिया (३८, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (४५) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (५२, दोघेही रा. गोंदिया) हे तिघे नोटा मोजताना आढळले.

Recommended read: आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्य गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन विशेष व्याख्यान

पोलिसांचा छापा पडताच हे तिघे घाबरले. त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. ते हवाला व्यावसायिक असल्यामुळे ही रोकडही हवालाची असल्याचा अंदाज बांधून ४ कोटी, २० लाखांची रोकड तसेच या तिघांना ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली ती सदनिका नेहाल वडालिया याची असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो अनेक दिवसांपासून हवालात गुंतला आहे. या कारवाईत स्वत: उपायुक्त राजमाने यांचा पुढाकार होता. एसीपी सुर्वे, पीआय ठाकरे, पीआय अरविंद पवार, एपीआय संदीप बागुल, दीपक वानखेडे आणि त्यांचे सहकारी मध्यरात्रीपर्यंत या कारवाईत करीत होते. इतकी मोठी रक्कम आली कुठून याचा तपास नागपूर पोलिस करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!